नवी दिल्ली :संसदेचं विशेष अधिवेशन 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यावेळी संसदेचं विशेष अधिवेशन नवीन संसद भवनात होणार आहे. मात्र, पहिल्या दिवसाचं अधिवेशन जुन्या इमारतीत सुरू होणार असून उर्वरित सत्र 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नवीन इमारतीत हलविण्यात येणार आहे असं सूत्रांनी सांगितलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात सरकार 'इंडिया' शब्द हटवण्याच्या प्रस्तावाशी संबंधित विधेयक मांडण्याची शक्यता आहे. याशिवाय, विशेष सत्रात चंद्रयान-3, आदित्य एल-1 सौर मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणासह देशानं अलीकडेच मिळवलेल्या यशांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
विशेष अधिवेशनात पाच बैठका : G-20 शिखर परिषदेशी संबंधित कार्यक्रम 9 ते 10 दरम्यान आयोजित केले जाणार आहेत. तसंच मुख्य शिखर परिषदेपूर्वी आयोजित करण्यात येणार्या प्रतिष्ठित कार्यक्रमाबाबतही चर्चा विशेष अधिवेशनात होणार आहे. मात्र, संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2047 पर्यंत भारताला 'विकसित देश' बनवण्यासाठी रोडमॅप तयार करण्यात येणार असून या विषयावरही चर्चा होणार आहे. 17व्या लोकसभेच्या 13व्या तसंच राज्यसभेच्या 261व्या अधिवेशनादरम्यान 18 ते 22 सप्टेंबर या काळात पाच बैठका होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
'इंडिया' शब्द काढून टाकण्याची शक्यता : भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मधील भारताच्या व्याख्येमध्ये वापरलेला 'इंडिया' शब्द काढून टाकण्याचा सरकार गंभीरपणे विचार करत आहे. अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही नागरिकांना 'इंडिया'ऐवजी भारत शब्द वापरण्याचं आवाहन केलं होतं. शतकानुशतकं आपल्या देशाचं नाव भारत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.