नवी दिल्ली Parliament Special Session :राजधानी नवी दिल्लीतसध्यासंसदेचं विशेष अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, आज नवीन संसद भवनात प्रवेश झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व खासदार जुन्या संसद भवनातून पायी चालत नवीन संसदेत पोहोचले.
महिला आरक्षणाला 'नारी शक्ती वंदन कायदा' नाव दिलं : नव्या संसदेत पोहोचताच पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाची घोषणा केली. 'अटलजींच्या कार्यकाळात अनेक वेळा महिला आरक्षण विधेयक आणलं गेलं. पण ते मंजूर करण्यासाठी संख्याबळ गोळा करता आलं नाही, त्यामुळे स्वप्न अपूर्ण राहिलं. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी देवानं मला निवडलं आहे', असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी महिला आरक्षणाला 'नारी शक्ती वंदन कायदा' असं नाव दिलं.
जुन्या संसदेत खासदारांचं फोटोशूट : मोदींनी नवीन संसद भवनातून खासदारांना संबोधित केलं. यावेळी बोलताना मोदींनी चंद्रयान ३ आणि जी २० च्या यशाचा उल्लेख केला. 'विज्ञानाच्या जगात चंद्रयान ३ चं यश प्रत्येक देशवासीयासाठी अभिमानास्पद आहे. भारताच्या नेतृत्वाखाली जी २० चं आयोजन गौरवास्पद होतं', असं ते म्हणाले. त्या आधी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांचं एकत्र फोटोशूट झालं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती जगदीप धनखर, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
नवीन संसद भवनात नव्या भविष्याचा श्रीगणेश साकारू : यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन केली. 'नवीन संसद भवनात नव्या भविष्याचा श्रीगणेशा आम्ही करणार आहोत', असं ते म्हणाले. १९४७ मध्ये येथेच ब्रिटिश सरकारनं सत्ता हस्तांतरित केली होती. हा सेंट्रल हॉलही त्या प्रक्रियेचा साक्षीदार आहे. आपलं राष्ट्रगीत आणि तिरंगा ध्वजही येथं स्वीकारण्यात आला. येथे चार हजारांहून अधिक कायदे बनले, असं मोदी म्हणाले.