नवी दिल्ली Parliament Security Breach :संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सुरक्षा भेदून दोन तरुणांनी गॅलरीतून आत उड्या मारल्या होत्या. या प्रकरणी आता दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं देशविघाताक कृत्य केल्याप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. संसदेच्या अधिवेशनात घुसखोरी करण्यापूर्वी हे सहा आरोपी गुरुग्राममध्ये विकी शर्मा नावाच्या व्यक्तीच्या घरी राहत होते. तिथच या प्रकरणाचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस विकी शर्माचीही कसून चौकशी करत आहेत.
संसदेत तरुणांची घुसखोरी प्रकरण विकी शर्माच्या घरात पाच तरुण राहिले, मात्र परिसरातील कोणालाही याची माहिती नाही. विकी शर्मा दिवसरात्र दारू पितो, पत्नीला मारहाण करतो. शेजाऱ्यांना शिवीगाळ करतो. अनेकवेळा पोलिसांकडं तक्रार करूनही काही फरक पडला नाही. याठिकाणी कोणी येत असल्याची कोणतीही माहिती आम्हाला मिळाली नाही. विकी शर्माच्या घरी कोणतीही संशयित हालचाल आम्हाला दिसली नाही. - विजय परमार, विकी शर्माचा शेजारी
पोलिसांनी केला यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल :बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात घुसखोरी करुन दोन तरुणांनी गॅलरीत उड्या मारल्या होत्या. यावेळी या दोघांनी हातात स्मोक कॅन घेऊन तो संसदेत पसरवला. त्यामुळे संसदेत मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्यावर यूएपीए ( UAPA ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून या चारही जणांची कसून चौकशी सुरू आहे.
गुरुग्राममध्ये थांबले होते तरुण : हिवाळी अधिवेशन सुरु असताना संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी दिल्ली पोलीस वेगानं कारवाई करत आहेत. पोलिसांनी गुरुग्राममध्ये विकी शर्माच्या घरी छापेमारी केली. विकी शर्माच्या घरी हे 6 आरोपी थांबले होते. विकी शर्माने या आरोपींच्या राहण्याची व्यवस्था केली होती, अशी माहिती पुढं आली आहे. इथूनच या सहा आरोपींनी संसदेतील सुरक्षा भेदण्याचा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. संसदेची सुरक्षा भेदल्याप्रकणी आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. तर दोघांना अटक करणं अद्यापही बाकी आहे.
दिल्ली पोलिसांनी विकी आणि त्याच्या पत्नीला घेतलं ताब्यात : संशयितांना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. राष्ट्रीय राजधानीशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांचं विशेष पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुरुग्राम पोलीस या प्रकरणात दिल्ली पोलिसांना सर्व मदत करेल. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. दिल्ली पोलिसांनी विकी आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. आम्ही दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहोत" अशी माहिती गुरुग्रामचे अतिरिक्त पोलीस आयुक्त वरुन दहिया यांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
विकी शर्माचा गुन्हेगारी रेकॉर्ड : दिल्ली पोलिसांनी गुरुग्रामच्या सेक्टर 7 गृहनिर्माण मंडळाच्या घर क्रमांक 67 वर बुधवारी सायंकाळी छापेमारी केली. यावेळी विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. विकी शर्माच्या चौकशीत त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचं स्पष्ट झालं. विकी शर्माच्या घरी हे सहा तरुण थांबले होते. विकी शर्मा हा 80 आणि 90 च्या दशकात फौजी गँगचा सक्रिय सदस्य असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याच्या परिसरातील कोणीही विकी शर्मासोबत बोलत नसल्याचं यावेळी नागरिकांनी सांगितलं. तो दिवसभर दारूच्या नशेत राहतो. अनेकदा पत्नीला मारहाण करत असल्याचंही त्याच्या शेजाऱ्यांनी यावेळी पोलिसांना सांगितलं.
हेही वाचा :
- 'या' सहा जणांनी मिळून रचला कट, सोशल मीडियावरून होते संपर्कात
- संसदेत राडा! प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी मारल्या उड्या; वाचा नेमकं काय घडलं?
- लातूरच्या अमोल शिंदेची संसदेबाहेर घोषणाबाजी, शेतमजूर म्हणून करतो काम