नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी पावसाळी अधिवेशन 2023 ची घोषणा केली. पावसाळी अधिवेशन 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जोशी यांनी ट्विट केले की, 'संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होईल आणि 11 ऑगस्टपर्यंत चालेल. पावसाळी अधिवेशनात विधिमंडळ कामकाज आणि इतर विषयांवर अर्थपूर्ण चर्चेसाठी मी सर्व पक्षांना हातभार लावण्याची विनंती करतो'. 23 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण 17 बैठका होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
विरोधकांची भाजपला घेरण्याची रणनीती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. त्यानंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनात विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसची प्रमुख मागणी अदानी प्रकरणाबाबत असेल. याप्रकरणी जेपीसीसी चौकशीची मागणी करत भाजप सरकारला घेरण्याची रणनीती पक्षाने आखली आहे. संसदेच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसने 19 समविचारी पक्षांचे नेतृत्व केले होते. या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्यात त्यांना यश आले होते. यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता, मात्र नंतर त्यांचे भाषण लोकसभेच्या रेकॉर्डमधून हटवण्यात आले होते.