नवी दिल्ली - विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. विरोधकांकडे बहुमत नसतानाही दाखल करण्यात आलेल्या या अविश्वास प्रस्तावावरुन भाजपाने विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीवर हल्लाबोल केला होता. यानंतर गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात अविश्वास ठरावावर सविस्तरपणे निवेदन दिले आहे. त्यानंतरच सभागृहाने आवाजी मतदान घेऊन अविश्वास ठराव नामंजूर केला आहे.
Live Update -
पहिल्यांदाच आमच्या सरकारमुळे ईशान्य भारताचा विकास होत आहे. ईशान्य भारतात जे आतापर्यंत मिळाले नाही ते आम्ही दिले आहे. मणिपूरमध्ये काँग्रेची सत्ता होती आणि तेव्हापासूनच तिथे अशांतता सुरू झाली असल्याचा दावा मोदींनी केला.
मणिपूरच्या मुद्द्यावरुन अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी आणला होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीच्या एका तासाच्या निवेदनात मणिपूरच्या उल्लेखच केला नाही. त्यामुळे विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला.
विरोधकांवर टीका करताना गुड का गोबर कैसे बनाना इसमे ये माहीर है अशी विखारी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेसवर देशातील अनेक राज्यांनी नो कॉन्फिडन्स व्यक्त केला आहे. त्यांच्या नो कॉन्फिडन्स मोशनला काही अर्थ नाही, असे मोदी यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले.
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यव्स्था बनेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. इतके वर्ष काँग्रेस सत्ते राहूनही हे सर्व करु शकली नाही. काँग्रेसकडे नीती, नियत व दूरदृष्टी नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.
LIC वरुन विरोधकांनी टीका केली होती. पण आता LIC यशस्वी कंपनी आहे. HAL कंपनी आज देशाची आण- बाण- शान आहे. विरोधक लोकशाहीवर टीका करत आहेत. त्यामुळे लोकशाही आणखी मजबूत होत आहे, देश आणखी मजबूत होत आहे. तसेच आमचे सरकारही मजबूत होत असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
'मोदी तेरी कब्र खुदेगी' ही विरोधकांची आवडती घोषणा आहे. विरोधकांना सिक्रेट वरदान मिळाले आहे. त्यामुळे विरोधक ज्यांचे वाईट चिंतत आहेत त्यांचे भलेच होत आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
देशातील तरुणांना घोटाळेविरहित सरकार दिले आहे. जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. देशातील परकिय गुंतवणूक वाढत आहे. देशातील निर्यातही नवे उच्चांक गाठत आहे. WHO नेही भारताचे कौतुक केले आहे. गेल्या पाच वर्षात साडे तेरा कोटी लोक गरिबीतून बाहेर आले असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी संसदेत दिली.
विरोधकांनी अनेक महत्वाच्या विधेयकांना विरोध केला आहे. ज्यांचे स्वत:चे हिशोब बिघडले आहेत ते आमचा हिशोब आता मागत आहेत. अविश्वास ठरावावर बोलण्यासाठी विरोधक तयारी करुन का येत नाहीत? असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना डिवचले आहे. तसेच पंतप्रधानांनी अधीर रंचन चौधरींनाही टोला मारला आहे.
देशातील जनतेचा आमच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मी देशातील जनतेचे आभार मानतो. विरोधकांना जनतेचा विश्वास घात केला आहे. विरोधकांना गरिबांच्या भुकेची चिंता नाही. तसेच 2024 मध्ये भाजपा पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
50 खासदारांचा पाठिंबा असल्यास अविश्वास ठराव :सरकारविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी विरोधकांना 50 खासदारांचे पाठबळ गरजेचे असते. त्यामुळे 50 खासदारांचा पाठिंबा असलेल्या कोणत्याही पक्षाचे सदस्य सरकारविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल करू शकतात. विरोधकांनी मणिपूर प्रकरणावरुन मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून आज या प्रस्तावावर चर्चेचा तिसरा दिवस आहे.
मोदी सरकारविरोधात दोनदा अविश्वास प्रस्ताव दाखल :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दोनदा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. याअगोदर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा बहाल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मोठ्या फरकाने हाणून पाडण्यात आला. तर आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सरकारला धोका नसल्याचे भाजपच्या खासदारांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. भाजपचे 303 खासदार संसदेत आहेत. तर एनडीएचे एकूण खासदार 331 आहेत. तर विरोधकांकडे फक्त 144 खासदारांची संख्या आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देणार विरोधकांना उत्तर :विरोधकांच्या इंडिया आघाडीने मणिपूर प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. त्या अविश्वास प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना उत्तर देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर प्रकरणावरही आज भाष्य करण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारवर गंभीर आरोप केले होते. मणिपूर प्रकरणी आपण घटनास्थळावर जाऊन आलो, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही मणिपूरवर बोलत नाहीत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर स्मृती इराणी आणि अमित शाह यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले.
फ्लाईंग किसवरुन गाजणार संसद :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस केल्याचा आरोप भाजपच्या खासदार तथा केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केला. त्यामुळे संसदेतील वातावरण चांगलेच गरम झाले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याबाबत राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत कारवाईची मागणी केली. तर दुसरीकडे भाजपाच्या खासदारांनीही राहुल गांधी यांच्या कथित फ्लाईंग किसवरुन सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याची मागणी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्याकडे केली.