नवी दिल्ली :मणिपूर हिंसाचारावरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ सुरू असून आज विरोधकांनी काळे कपडे घालून मणिपूर हिंसाचाराचा निषेध केला आहे. दुसरीकडे झारखंडचे खासदार निशिकांत दुबे यांनी रखडलेल्या उड्डाण पुलाचे बांधकाम, राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यासह निशिकांत दुबे यांनी राष्ट्रीय महामार्गावर होणारे अतिक्रमण, गतीरोधकांमुळे होणारे अपघाताचा मुद्दाही उपस्थित केला. त्यावर रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे उत्तर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. उड्डाण पुलाच्या बांधकामात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाच वर्षापासून उड्डाण पूल रखडले :झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मतदार संघात पाच वर्षाअगोदर राष्ट्रीय महामार्गावर चार उड्डाणपूल बनवण्यात येणार होते. त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र त्या उड्डाणपुलाचे बांधकाम अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे खासदार निशिकांत दुबे यांनी राज्य सरकारच्या पीडब्लूडीच्या माध्यमातून हा उशीर होतो का, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिले. या चार उड्डाणपुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने उशीर केल्यामुळे तो बदलण्यात आला. मात्र त्यानंतर जर राष्ट्रीय रस्ते महामार्ग विभागाकडून उशीर होत असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.