नवी दिल्ली: राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. अविश्वास ठरावावर ८ ऑगस्ट ते ९ ऑगस्टला चर्चा होणार आहे. तर १० ऑगस्टला सरकारकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे.
राज्यसभेत सभापतींनी मणिपूर हिंसाचारावर नियम 176 अंतर्गत अल्प कालावधीची चर्चा सुरू करण्याची सूचना केली. चर्चेला सुरुवात करण्यासाठी सभापतींनी राज्यसभा खासदार वीरेंद्र प्रसाद वैश यांचे नावही पुकारले. यानंतर लगेचच विरोधी खासदारांनी आपल्या जागेवर उभे राहून या कारवाईचा निषेध करत गदारोळ सुरू ठेवला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर तपशीलवार चर्चा झाली पाहिजे. या मुद्द्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर उद्यापर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
अध्यादेश भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा-गृहमंत्री अमित शाह आज दिल्ली सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीसंदर्भात महत्त्वाचे सेवा विधेयक संसदेत मांडणार आहेत. हे विधेयक मंजूर झाल्यावर प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असून दिल्ली सरकारचे अधिकाऱ्यांबाबतचे अधिकार कमी होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि दिल्लीमधील आप सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून मोठा वाद सुरू आहे. हा अध्यादेश भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे.
सोमवारी दिवसभरासाठी कामकाज तहकूब -मणिपूरमधील हिंसाचारामुळे विरोधकांनी केलेल्या विरोधामुळे संसदेचे पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठप्प होत आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून चर्चेची मागणी केली जात आहे. मात्र, पंतप्रधानांच्या संसदेतील निवदेनावर अजूनही ठाम निर्णय घेण्यात आला नाही. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाजही सोमवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. सकाळी ११ वाजता सभागृहाची बैठक झाली होती. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मलावीचे संसदीय शिष्टमंडळ भारत भेटीवर येत असल्याची घोषणा केली. मलावी संसदीय शिष्टमंडळाने सभागृहाचे कामकाज पाहिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर -विरोधी पक्षाचे सदस्य मणिपूरवर पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याची सातत्याने मागणी करत होते. अविश्वास ठराव प्रलंबित असतानाही सभागृहाचे कामकाज चालू असल्याबद्दल विरोधी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्याबरोबरच पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार आहेत.
हेही वाचा-
- Manipur Violence : मणिपूर विषयावर चर्चेसाठी अखेर केंद्र सरकार तयार; अमित शाहांचे विरोधकांना पत्र
- Parliament Monsoon Session 2023 : संसदेचे पावसाळी अधिवेशन 'या' मुद्द्यांवरुन वादळी होण्याची शक्यता