नवी दिल्ली: संसदेच्या मान्सून आजपासून सुरू होत आहे. परंतु पहिलाच दिवस दोन्ही सभागृहासाठी वादाचा ठरला असून दोन्ही सभागृहातील कामकाज उद्या 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. लोकसभा 2 वाजेपर्यंत तर राज्यसभा 12 वाजपर्यंत तहकूब करण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरू झाले. परंतु काही वेळात दोन्ह सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झाले आहेत. माध्यमांशी बोलताना मोदी म्हणाले, की संसदेतील सर्व सहकारी सहकार्य करतील अशा विश्वास आहे. कायदे करणे व त्यांचा विस्तार करणे ही संसद व खासदार यांची जबाबदारी आहे. जनतेच्या हितासाठी विधेयक सादर करण्यात येणार आहे. खासदारांनी संसदेत मिळणाऱ्या वेळेचा चांगला उपयोग करावा. वाद हे चर्चेने सोडविण्याची परंपरा आहे. मणिपूरमधील घटनेने खूप दु:ख झाले आहे. ह्रदयात खूप क्रोध आहे. मणिपूरमधील घटना ही अत्यंत लाजिरवाणी आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
अधिवेशनाच्या सत्रात विरोधी पक्ष मणिपूरची परिस्थिती आणि दिल्ली प्रदेश सरकार सुधारणा अध्यादेश या मुद्द्यांवरुन मोदी सरकारला कोंडीत पकडणार आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) पराभव करण्यासाठी 26 विरोधी पक्षांनी एक दिवस अगोदर भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी (INDIA) ची स्थापना केली आहे. आज पावसाळी अधिवेशन 2023 सुरू होत आहे, यामुळे विरोधी पक्ष एनडीएला कोंडीत पकडणार असल्याचे सांगितले जात आहे.
विरोधी पक्ष मोदी सरकारला घेरणार : विरोधी पक्ष संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उचलून धरणार आहे. ईशान्येकडील मणिपूर राज्यात 3 मेपासून सुरू झालेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 160 लोकांचा मृत्यू झाला आहे. संसदेच्या या अधिवेशनादरम्यान दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार सुधारणा अध्यादेश आणि त्याच्याशी संबंधित विधेयकाचा मुद्दा देखील उपस्थित केला जाणार आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (आप) दिल्लीतील नोकरशहांच्या नियुक्ती आणि बदलीशी संबंधित या अध्यादेशाला विरोध करत आहे. हे अध्यादेश केंद्र सरकारने मे महिन्यात जारी केला होते.