नवी दिल्ली : मणिपूर प्रकरणावरुन 'इंडिया'च्या घटक पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ केला आहे. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा अनेक वेळा तहकूब करण्यात आली आहे. आजही मणिपूर प्रकरणावरुन संसदेत घमासान होण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची संसदेत 'वापसी' झाल्यानंतर काँग्रेस खासदारांना बळ प्राप्त झाले आहे. अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी हे बोलण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज लोकसभेतील खासदारांची पक्ष कार्यलयात बैठक बोलावली आहे. त्यामुळे आज भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेस रणनीती आखणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Live Update :
- राहुल गांधींचा हल्लाबोल म्हणाले. . आज अदानीवर बोलणार नाही :काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निलंबन रद्द केल्यानंतर पहिल्यांदाचा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज हजेरी लावली. लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी आज सत्ताधारी आणि भाजपवर चांगलीच टीका केली. मी आज अदानीवर बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाना साधला. मणिपूर प्रश्नांवरुन मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान अद्यापही मणिपूरला गेले नाहीत, मी मात्र भेट देऊन आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
- प्रियंका चतुर्वेदींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल :शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मनमोहन सिंग, शिबू सोरेन आदी वरिष्ठ नेते अगोदरपासून मणिपूर हिंसाचार प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन करण्याची मागणी करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सदनात उपस्थित राहून का चर्चा करत नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या 'बेटेको बचाना है, दामाद को टीकाना है' टीकेवर नाराजी व्यक्त केली. कोणावर वैयक्तीक टीका करने योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 'इंडिया'च्या घटक पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
- ए घमंडिया छोडो इंडिया, रवि किशन यांचा हल्लाबोल :काँग्रेसने देशात 65 वर्ष सत्ता उपभोगली आहे. या 65 वर्षात काँग्रेसने देशात परिवारवाद, जातीवाद पसरवला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर या लोकांनी देशाचे हजारो, लाखो रुपये हडपल्याचे उघड झाल्याचा हल्लाबोल केला. आता देशात सडका होत आहेत, विकास होत आहे. गरीब, वंचित, शोषित आणि शेतकऱ्यांचा विकास होत आहे. समस्त भारत आणि भाजप त्यामुळेच ए घमंडिया छोडो इंडिया म्हणत असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.