नवी दिल्ली : मणिपूर घटनेवरुन विरोधी पक्षांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरू केला आहे. आज संसदेच्या तिसऱ्या दिवशीही काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे मणिपूर घटनेबाबत आजही दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर घटनेवर संसदेत निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. तर विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान विरोधकांनी मणिपूर प्रकरणावरुन लोकसभेत जोरदार गदारोळ केल्यामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभा दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
Live updates-
- जगात अशी कोणतीही संसदीय लोकशाही नाही जिथे संसदेत पंतप्रधानांना भेटण्याची, प्रश्न विचारण्याची परवानगी नाही. पंतप्रधानांनी घेतलेली ही विचित्र भूमिका असल्याचा हल्लाबोल काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केला.
- मणिपूर मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. यावर राज्यसभेच्या अध्यक्षांनी आप खासदार संजय सिंह यांना पावसाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले आहे.
राजस्थानच्या भाजप खासदारांचे संसदेत आंदोलन :राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाल्याचा आरोप राजस्थानच्या भाजप खासदारांनी केला आहे. भाजपच्या खासदारांनी राजस्थानमधील महिलांवरील अत्याचाराचा ठपका मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर ठेवला आहे. त्यामुळे भाजपने अशोक गहलोत यांच्या राजिनाम्याची मागणी केली आहे. भाजप खासदार रवि किशन यांनी राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचार वाढल्याप्रकरणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजीनामा देण्याची मागणूी केली आहे. भाजप खासदारांनी संसदेतील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले आहे.