नवी दिल्ली :मणिपूरमध्ये झालेल्या दोन महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणामुळे विरोधकांनी संसदेच्या अधिवेशनात चांगलाच गदारोळ केला. या प्रकरणावरुन विरोधकांनी संसदेचे कामकाज बंद पाडल्याने आता आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणामुळे भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलेच राजकारण तापले आहे. मणिपूर प्रकरणावर चर्चेसाठी सरकार तयार असतानाही विरोधकांनी संसदेचे कामकाज विस्कळीत केल्याचा आरोप भाजपने केला आहे. संसदेत या विषयावर चर्चा झाली, तर काँग्रेसशासित राज्यांमधील महिलांवरील अत्याचाराचा विषय पुढे आला असता, असा आरोपही भाजपने केला आहे. दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरला असून लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान राज्यसभेतही विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब :विरोधकांनी लोकसभेत मणिपूरच्या महिलांवर अत्याचार प्रकरणामुळे चांगलाच गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज अगोदर 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मणिपूर महिलांवरील अत्याचारप्रकरणी सत्ताधारी चर्चा करण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र त्यानंतरही विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्यामुळे लोकसभा सोमवार 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब :पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी घोषणाबाजी करत हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील परिस्थितीवर चर्चेची मागणी केली. यावेळी विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब केल्यानंतर भाजपने विरोधकांवरच आरोप केला आहे. संसदेबाहेरही काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि समाजवादी पक्षासह विरोधी पक्षांनी मणिपूरमधील जातीय हिंसाचार आणि दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या कथित व्हिडिओवरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली.
विरोधक सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा निर्धार :विरोधकांनी मणिपूर घटनेवरुन संसदेत गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकारांना माहिती दिली. सरकारने चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले असतानाही काँग्रेस आणि उर्वरित विरोधी पक्षांनी सभागृहाचे कामकाज विस्कळीत केल्याचे पीयूष गोयल यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा निर्धार करूनच विरोधक आले होते, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसशासित राज्यांमध्ये महिलांशी गैरवर्तन :बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना झाल्यामुळे विरोधक चिंतेत असल्याचा टोला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी लगावला. काँग्रेसशासित राज्यांमध्ये महिलांशी गैरवर्तन होत आहे. कदाचित यामुळे विरोधक चर्चेपासून दूर पळत असल्याचेही पीयूष गोयल म्हणाले. सरकार मणिपूरवर चर्चेसाठी तयार आहे. परंतु दुर्दैव आहे की काँग्रेस, टीएमसी आणि बाकीचे विरोधी पक्ष स्वतःला लपवण्यासाठी यापासून दूर पळत आहेत. त्यांना कोणतीही चर्चा करायची नसल्याचेही पीयूष गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.