नवी दिल्ली :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारताच्या लोकशाहीबद्दल लंडनमध्ये केलेल्या विधानावर आणि अदानीशी संबंधित प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरून मंगळवारी सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सुमारे पाच मिनिटांनी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
लोकसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब : सभागृहाचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य आपापल्या जागेवर उभे राहिले. भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी 'राहुल गांधी माफी मागा' अशा घोषणा दिल्या, तर काँग्रेसच्या सदस्यांनी अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू केला. बिर्ला यांनी पुरवणी प्रश्न विचारण्यासाठी बिजू जनता दलाचे खासदार अनुभव मोहंती यांचे नाव पुकारले. मोहंती यांनी सभागृहात सुव्यवस्था नसल्याचा वारंवार उल्लेख केला. त्यानंतर बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही पक्षांच्या सदस्यांना आपापल्या जागेवर बसून सभागृहाचे कामकाज चालू देण्याचे आवाहन केले. मात्र तरीही गदारोळ थांबत नसल्याचे पाहून त्यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले.