नवी दिल्ली : संसदेच्या बजट सत्रात अदानींच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काही वेळातच तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर विरोधी पक्षाचे खासदार एकत्र आले आणि त्यांनी अदानी मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली. खासदारांनी हातात मोठे बॅनर पोस्टर्स घेत विरोध प्रदर्शन केले आहे. अदानी समूह प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यासाठी विरोधी खासदार एकत्र आले होते.
अदानी मुद्द्यावरून विरोधकांची बैठक : कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'अदानीचा मुद्दा आम्ही संसदेत आक्रमकपणे मांडू. एवढ्या मोठ्या मुद्द्यावर सरकार आणि विशेषत: पंतप्रधान मोदी गप्प का आहेत?'. अदानी मुद्द्यावरून संसदेत विरोधकांच्या रणनीतीवर लोकसभेतील काँग्रेसचे नेते ए.आर. चौधरी म्हणाले, 'आमची या मुद्यावर बैठक होणार आहे. बैठकीला सर्व विरोधक एकत्र येतील. यावर चर्चा होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. हा केवळ काँग्रेसचा नाही, तर भारतातील सर्वसामान्यांचा मुद्दा आहे'. ते पुढे म्हणाले, 'मी निर्मला सीतारामन यांना सांगू इच्छितो की, भारतात निरंकुशता नाही तर लोकशाही आहे. जेव्हा आपण आपली मते आणि मागण्या मांडतो तेव्हा तो दांभिकपणा नाही तर ती लोकशाही आहे. तुमचे सरकार जे करत आहे ती निरंकुशता आहे'.
हेही वाचा : Five Judges In Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाला आज मिळतील पाच नवे न्यायाधीश ; संक्षिप्तपणे जाणून घ्या या न्यायाधीशांबद्दल