नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज आज सकाळी सुरू झाले. संसदेत आजही विरोधी पक्षांचा गदारोळ सुरूच होता. अदानी प्रकरणावरून राज्यसभेत विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले आहेत. वाढता गोंधळ पाहून सभापतींनी सभागृहाचे कामकाज सकाळी 11.50 वाजेपर्यंत तहकूब केले होते. 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत विरोधकांनी संसदेत गदारोळ केला होता.
'राहुल गांधी असंसदीय बोलले नाहीत' :काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, 'आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राचा शेवटचा दिवस असल्याने, आम्ही अदानी समस्येचे निराकरण कसे करू शकतो आणि आमचे सभापती याप्रकरणी काय करतील यावर चर्चा करू. तसेच यावर आम्ही इतर पक्षांच्या नेत्यांचेही मत घेणार आहोत'. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना दिलेल्या नोटीसवर खरगे म्हणाले, 'राहुल गांधी संसदेत जे काही बोलले ते आधीच सार्वजनिक क्षेत्रात होते आणि त्यात असंसदीय काहीही नाही. त्यामुळे ते त्यानुसार नोटीसला उत्तर देतील'.
मनीष तिवारींची चीनवर चर्चेची मागणी :काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी सोमवारी लोकसभेत चीनसोबतच्या सीमा परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. या प्रकरणी लोकसभेत सविस्तर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एप्रिल 2020 पासून चीन केवळ आपली जमीन बळकावण्यामध्ये गुंतलेला आहे. 16 जानेवारी 2023 पर्यंत भारत आणि चीन यांच्यातील कमांडर-स्तरीय चर्चा फार कमी वेळा यशस्वी झाल्या आहेत, असे तिवारी यांनी स्थगन प्रस्तावाची मागणी करणाऱ्या पत्रात म्हटले आहे.