नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान मोदी आज लोकसभेत उत्तर देणार आहेत. मंगळवारी संसदेत भाजप आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काल अनेक गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी पंतप्रधान मोदींच्या संगनमताचा आरोप केला आहे. आता सत्ताधारी पक्षाने लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव दाखल केला. लोकसभेतील ज्येष्ठ खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र लिहिले आहे.
काल संसदेत गदारोळ : अदानी वादावर चर्चेची आणि जेपीसीच्या मागणीवरून विरोधी खासदारांनी काल संसदेत गदारोळ केला होता. सभागृहातील गदारोळामुळे कालही झिरो अवर होऊ शकला नाही. काल बैठकीच्या सुरुवातीला राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी सोमवारी सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपाचा संदर्भ देत मृतांप्रती शोक व्यक्त केला. यानंतर भूकंपात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ सदनात काही क्षण मौन पाळण्यात आले.