नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील आज पाचवा दिवस आहे. आजही गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी उपस्थित होते. तर जेपीएचे खासदार राहुल गांधींना माफी मागण्याचे आवाहन करत होते.
चार दिवसांपासून कामकाज ठप्प : गेल्या चार दिवसांपासून सततच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज ठप्प झाले आहे. आज शुक्रवारीही संसदेचे कामकाज चालवण्याबाबत पक्षांमध्ये एकमत झाले नाही. भारतीय जनता पक्षाकडून राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतातील लोकशाहीबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावरून भाजपचे खासदार सभागृहात गोधळ घालत आहेत.
राहुल गांधींनी लोकसभेत वेळ मागितली : राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगितले की, आपण लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली असून या प्रकरणी लोकसभेत आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली आहे. शुक्रवारी लोकसभा अध्यक्ष त्यांना बोलण्यासाठी वेळ देणार की सभागृहातील गदारोळ चालूच राहणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शुक्रवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की, राहुल गांधींना बिनशर्त माफी मागावी लागेल. ते म्हणाले की, राहुल गांधींनी परदेशात देशाचा अपमान केला आहे. काँग्रेस आणि पाकिस्तानची भाषा एकच आहे.