नवी दिल्ली :गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज आजचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवणे आणि त्यांचे दिल्लीतील अधिकृत निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस यावरून आज संसदेत विरोधक आणि सरकार यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला. केंद्र सरकार त्यांना लक्ष्य करण्याची घाई करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केला आहे. सोमवारी विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळे कपडे घालून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला होता. त्यानंतर त्यांनी संसदेच्या संकुलात निदर्शने करत विजय चौकापर्यंत मोर्चा देखील काढला.
बीआरएस खासदारांचा संसदेत स्थगन प्रस्ताव : बीआरएस खासदारांनी संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याची मागणी करत स्थगन प्रस्ताव मांडला आहे. स्थगन प्रस्तावात खासदारांनी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बीआरएस पक्षाच्या आमदार कविता महिला आरक्षण विधेयक आणण्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसल्या होत्या. सभागृहातील रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसने आज सकाळी 10:30 वाजता संसदेतील काँग्रेस संसदीय पक्षाच्या कार्यालयात राज्यसभा आणि लोकसभा खासदारांची बैठक बोलावली आहे.