नवी दिल्ली : राहुल यांनी लंडनमध्ये केलेले वक्तव्य आणि अदानी समूहाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्ष भाजप यांच्यात संसदेत संघर्ष सुरूच आहे. अशातच त्यांची खासदराकी गेल्याने काँग्रेसला मोठा धक्का आहे. सुरत कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा दिल्याने त्यांची खासदारकी रद्द झाली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 'वित्त विधेयक 2023' लोकसभेत मांडले, जे विरोधी पक्षाच्या गदारोळातच मंजूर करण्यात आले आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि पेन्शन प्रणाली पूर्ण करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल. यानंतर गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
कॉंग्रेस न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे :या प्रकरणी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, कॉंग्रेस कोणाविरोधात आंदोलन करत आहेत हे त्यांनी सांगावे, कारण हा निर्णय कोणत्याही राजकीय पक्षाने नव्हे तर न्यायालयाने घेतला आहे. ते न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अपमान केला असून त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. जनताच त्यांना धडा शिकवेल.
आज वित्त विधेयक 2023 सादर होणार : केंद्र सरकारच्या आर्थिक प्रस्तावांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज वित्त विधेयक 2023 सादर करणार आहेत. अनुदानाची मागणी संसदेत मंजूर झाल्याच्या एका दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी, गुरुवारी लोकसभेने 2023 - 24 साठी सुमारे 45 लाख कोटी रुपयांच्या खर्चास अधिकृत अनुदानाची मागणी मंजूर केली आहे.
कॉंग्रेस जेपीसीच्या मागणीवर ठाम : काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांनी अदानी समुहाच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्यात सरकार अपयशी ठरल्याबद्दल चर्चा करण्यासाठी नियम 267 अंतर्गत कामकाजाच्या निलंबनाची सूचना दिली. गुरुवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ झाला होता. मात्र, या गदारोळातच विनियोग विधेयक 2023 लोकसभेत मंजूर करण्यात आले. दरम्यान, झारखंड, छत्तीसगड आणि बंगालसह 9 राज्यांतील प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयला दिलेली संमती मागे घेण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. सभागृहाचे कामकाज तहकूब करण्याबाबत पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
हेही वाचा :JP Nadda on Rahul Gandhi : राहुल गांधींचा अहंकार खूप मोठा, मात्र समज फार कमी आहे - जेपी नड्डा