हावेरी (कर्नाटक) Dead Body Under Salt : कर्नाटकातल्या हावेरी जिल्ह्यातील गालापुजी गावात रविवारी (२४ डिसेंबर) एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर समाजमन सुन्न झालं आहे.
तलावात बुडून मृत्यू झाला : झालं असं की, येथे हेमंत (१२) आणि नागराज (११) ही गावातील दोन मुलं तलावात पोहायला गेली होती. दरम्यान, पोहताना तलावात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मात्र पाण्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पालकांनी मुलांचा अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. पालकांचा विश्वास होता की, मृतदेह मिठानं झाकून ठेवल्यास ते पुन्हा जिवंत होतात!
सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिला होता : या प्रकरणी गावकऱ्यांनी सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. या व्हिडिओत म्हटलं होतं की, मृत व्यक्तीला पाच तास मिठानं झाकून ठेवल्यास तो जिवंत होऊ शकतो. चमत्कार केव्हाही घडू शकतो आणि असं करून पाहण्यात काहीही नुकसान नसल्यामुळे या जोडप्यानं सोशल मीडियावर जे पाहिलं तेच करण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी समजूत काढली : तलावातून दोन्ही मृतदेह बाहेर काढल्यानंतर जोडप्यानं त्यावर काही किलो मीठ टाकलं. त्यानंतर त्यांनी दोन्ही मुलांचे मृतदेह तब्बल सहा तास मिठाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवले. मात्र काहीही झालं नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच कागीनेळे पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी पोहोचलं. सहा तास उलटूनही काहीही झालं नसल्यानं पोलिसांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यासाठी पालकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर बरीच समजूत काढल्यानंतर पालकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यास परवानगी दिली.
या आधीही घडली अशी घटना : गतवर्षी राज्यातील बेल्लारी येथे अशाच प्रकारची घटना घडली होती. येथे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या मुलाचा मृतदेह मिठानं झाकून जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आपल्या १० वर्षाच्या मुलाचा मृतदेह चार तास मिठाखाली झाकून ठेवला, मात्र काहीही न झाल्यानं अखेर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला होता. गावकऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट पाहिली होती, ज्यामध्ये म्हटलं होतं की असं केल्यानं मृतांना जिवंत केलं जाऊ शकतं.
हे वाचलंत का :
- भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पाच महिन्याच्या बाळाचा मृत्यू; झोपेत असताना केला हल्ला
- किडनी देऊन भावाचा जीव वाचवणं महिलेला पडलं महागात; संतापलेल्या पतीनं सौदी अरेबियातून व्हॉट्सअॅप वर दिला 'तलाक'
- गावकरी ज्या दगडांची कुलदेवता म्हणून पूजा करायचे, ती निघाली डायनासोरची अंडी!