अहमदाबाद -सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' संकुलात 'राष्ट्रीय एकता दिन' साजरा केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सहभाही झाले आहेत. तसेच त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे समारंभाला संबोधित करणार आहेत.
गृहमंत्री अमित शाहंनी वाहिली आदरांजली -
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून त्यांना नमन केले. शाह यांनी लिहिले की, 'सरदार पटेल यांचे जीवन आपल्याला सांगते की, एक व्यक्ती त्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती, लोखंडी नेतृत्व आणि अदम्य देशभक्तीने देशातील सर्व विविधतेचे एकात्मतेत रूपांतर कसे करू शकते आणि अखंड राष्ट्राचे रूप देऊ शकते. देशाच्या एकात्मतेसोबतच स्वतंत्र भारताचा प्रशासकीय पाया घालण्याचे कामही सरदार साहेबांनी केले आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले, 'सरदार साहेबांचे मातृभूमीसाठीचे समर्पण, निष्ठा, संघर्ष आणि बलिदान प्रत्येक भारतीयाला देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी स्वत:ला समर्पित करण्याची प्रेरणा देते. अखंड भारताच्या अशा या महान शिल्पकाराच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व देशवासियांना 'राष्ट्रीय एकता दिना'च्या हार्दिक शुभेच्छा.
जगातील सर्वांत उंच पुतळा -
2018 मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचे अनावरण करण्यात आले. सरदार पटेल यांचा हा पुतळा 182 मीटर उंच असून हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी अथॉरिटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शाह पहाटे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि नंतर परेडची सलामी घेतील ज्यामध्ये निमलष्करी दल आणि गुजरात पोलिस कर्मचारी भाग घेतील. यामध्ये आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ, सीआरपीएफ आणि बीएसएफचे 75 सायकलस्वार आणि त्रिपुरा, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर आणि गुजरातच्या पोलिस दलातील 101 मोटरसायकलस्वारही या परेडमध्ये सहभागी होणार आहेत. सायकलिंग कर्मचार्यांनी सुमारे 9,000 किमी अंतर कापले आहे तर मोटरसायकलस्वारांनी देशाच्या विविध भागातून 9,200 किमी अंतर कापले आहे. तसेच ऑलिम्पिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील 23 पदक विजेतेही या स्पर्धेत सहभागी होतील, असे निवेदनात म्हटले आहे. परेडमध्ये ITBP आणि गुजरात पोलिसांचा संयुक्त बँड असेल.
लोहपुरूष सरदार पटेल -
2014 मध्ये केंद्र सरकारने सरदार पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर हा 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. सरदार पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी नडियाद (गुजरात) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. लंडनला जाऊन त्यांनी बॅरिस्टरचे शिक्षण घेतले आणि परत येऊन अहमदाबादमध्ये वकिली करू लागले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन ते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशाचे पहिले उपपंतप्रधानपद भूषवले. सरदार पटेल हे भारतीय प्रजासत्ताकचे संस्थापक जनक असल्याचे म्हटले जाते, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावली आणि एकात्म, स्वतंत्र राष्ट्रामध्ये त्याचे एकीकरण करण्याचे मार्गदर्शन केले.