मुंबई - भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षात डावलले जात असल्याची चर्चा नेहमीच होत असते. त्याप्रकारच्या बातम्याही येत असतात. त्यावर पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. मात्र सध्या त्या नेमके काय करत आहेत, याची जास्त काही माहिती प्रसारमाध्यमात येत नाही. मात्र त्यांनी त्यांचे नेमके काय चालले आहे. याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे.
पंकजा मुंडे यांनीच ट्विटरवरुन माहिती देताना त्या कोणत्या कामात व्यग्र आहेत ते स्पष्ट केले आहे. कालच्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, "भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुरमुजी यांनी कालपासून छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांचा दौरा केला होता. मध्य प्रदेशची सहप्रभारी म्हणून त्यांच्यासोबत भोपाळला भेट दिली. येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या स्वागताने श्रीमती मुरमुजी प्रभावित झाल्या."
भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याची चर्चा असली तरी त्या भाजपच्या केंद्रिय मध्यवर्ती वर्तुळात सक्रिय असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना संधी दिली नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पाहायला मिळाली. 12 मे रोजी सायंकाळी काही समर्थकांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर जाऊन गोंधळ घातला होता. कराड यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत त्यांनी पंकजा मुडेंना उमेदवारी देण्याची मागणी त्यावेळी करण्यात आली. यावेळी मुंडे आणि भागवत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत मुंडे समर्थकांना ताब्यात घेत कारवाई केली होती. अशाच प्रकारे इतर ठिकाणीही मुंडे समर्थक नाराज असल्याचे दिसून आले. मात्र नंतर सर्व शांत झाले.