डेहराडून (उत्तराखंड) :आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची चर्चा सध्या दोन्ही देशांमध्ये सुरू आहे. एकीकडे सीमा हैदरवर गुप्तहेर असल्याचा आरोप होत आहे. तर यासोबतच तिला पाकिस्तानात परत पाठवण्याची देखील मागणी होत आहे. दरम्यान, सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी सीमा हैदरची पॉलीग्राफ चाचणी करण्याची मागणी करणारा अर्ज दिला आहे. जेणेकरून सीमा हैदर खरंच प्रेमाखातर भारतात आली की आणखी काही उद्देश पूर्ण करण्यासाठी ती प्रेमाचे नाटक करत आहे हे कळू शकेल.
सीमा हैदरचे वकील काय म्हणाले : सीमा हैदर प्रकरणात सीमाचे वकील एपी सिंह यांनी ईटीव्ही भारतशी केलेल्या विशेष संवादात सांगितले की, सीमाने पाकिस्तानमध्ये हिंदू धर्म स्वीकारला आणि ती नेपाळमार्गे भारतात आली. सीमाने बुलंदशहरमध्ये लग्नाची नोंदणी करण्यासाठी अर्ज केला. त्याचवेळी तिच्यावर एफआयआर नोंदवण्यात आला. सीमा हैदरचा यावर कोणताही आक्षेप नाही. कारण सीमाने तिच्या जन्मापासून आतापर्यंतची सर्व कागदपत्रे सोबत आणली आहेत. ती सर्व कागदपत्रे पोलिसांना देण्यात आली आहेत. या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे, असे ते म्हणाले.
सीमा आणि सचिन यांना एकत्र राहण्याची परवानगी द्यावी : सीमा हैदरच्या वकिलांनी सांगितले की, सध्या एजन्सी तपास करत आहे. असे असतानाही त्यांची सीबीआय, एनआयए, रॉ आणि आयबी या सारख्या बड्या एजन्सींकडून तपास करण्याला काही हरकत नाही. मात्र सध्या या प्रकरणी मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. सचिन आणि सीमा यांना वेगळे ठेवले जात असल्याने त्यांची मुले अन्न खात नाहीत. अशा स्थितीत तपास सुरूच ठेवला पाहिजे, पण दोघांनाही एकत्र ठेवावे, अशी मागणी सीमाच्या वकिलांनी केली आहे.