महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या गिरट्या; सैन्याने गोळीबार करताच फिरले माघारी - Pakistani Drone news

पंजाबच्या डेरा बाबा नानक भागात तैनात केलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन दिसला. गोळीबाराच्या सात फेऱ्या झाडल्यानंतर पाकिस्तानी ड्रोन परत गेला. यानंतर बीएसएफने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

ड्रोन
ड्रोन

By

Published : Jun 18, 2021, 12:09 PM IST

नवी दिल्ली - पंजाबमधील डेरा बाबा नानक भागात तैनात केलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोन दिसला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर भारतीय सैन्याने गोळीबार करत ड्रोनला परत माघारी धाडले. सकाळी जवळपास 4.40 वाजता बीएसएफच्या जवानांनी ड्रोनचा आवाज ऐकला. गोळीबाराच्या सात फेऱ्या झाडल्यानंतर पाकिस्तानी ड्रोन परत गेला. यानंतर बीएसएफने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

पाकिस्तानची ड्रोन विमाने दिसल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, सीमेवर तैनात असलेल्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार करत मनसुबे हाणून पाडले. सीमेवर जवानांची गस्त असल्याने आता पाकिस्तानने सीमेवरून पंजाबमध्ये ड्रोन विमाने पाठवण्याची नवी युक्ती वापरली आहे. ड्रोनचा उपयोग गुप्तहेरी करण्यासाठी केला जातो. हे ड्रोन फोटो आणि व्हिडिओ घेतात. तर भारतीय हद्दीत शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून भारतात येणाऱ्या या ड्रोनला खाली पाडण्याची परवानगी भारतीय सुरक्षा दलांना ऑक्टोंबर 2019 मध्ये मिळाली होती.

मागील काही दिवसांपासून भारत पाकिस्तान सीमेवर बीएसएफला मानवरहित ड्रोन उडताना आढळून आली आहेत. चीनी बनावटीच्या या ड्रोनद्वारे बंदुका आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी दहशतवादी वापर करत आहेत. पंजाब राज्यामध्ये, अशी ड्रोन आढळून आली आहेत. ही मानवरहीत ड्रोन भारतामध्ये पाठवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर दहशतवादी गटांना मदत करत असल्याची माहिती आहे.

भाजपाकाळात शस्त्रसंधीचे उल्लंघन अधिक -

भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर सतत शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटना पाकिस्तानकडून घडत असतात. 2020 या वर्षामध्ये पाकिस्तानकडून भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तब्बल 4665 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 17 वर्षांत पाकिस्तानने तब्बल 11 हजार पेक्षा अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातील यूपीए सरकारच्या काळामध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याचे प्रमाण हे हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे होते. मात्र, 2014 मध्ये भाजप सरकार आल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव वाढला असून, बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन पाहायला मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details