श्रीनगर :जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात आज पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. या भागात सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. रविवारी दुपारी तीनच्या हा प्रकार सुरू झाला, ज्यावर भारतीय सैन्यही जोरदार प्रत्युत्तर देत आहे.
पाकिस्तानने याच ठिकाणी शनिवारीही मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता. शनिवारी रात्री उशीरा हा गोळीबार थांबला. त्यानंतर, आज पुन्हा याठिकाणी गोळीबार सुरू झाल्याची माहिती लष्कराने दिली.
नववर्षामध्येही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच..
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजौरीच्या नौशेरा भागामध्ये सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला होता. यावेळी करण्यात आलेल्या गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यांमध्ये देशाच्या एका जवानाला वीरमरण प्राप्त झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात नायब सुभेदार रविंदर हे जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांना वीरमरण प्राप्त झाले, अशी माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.