श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराने आज (शुक्रवार) जम्मू काश्मीरातील उरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या ३ जवानांना वीरमरण आले. यातील २ जवान उरी सेक्टरमध्ये आणि एक जवान गुरेज सेक्टरमध्ये शहीद झाले. भारताने प्रत्युत्तर दाखल जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती लष्करातील सूत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानचे सात ते आठ जवान ठार
उरी सेक्टरमध्ये तीन नागरिकही पाकिस्तानच्या गोळीबारात ठार झाले तर काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. उरीचे विभागीय अधिकारी रियाज अहमद मलिक यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतानेही जोरदार गोळीबार केला. यात पाकिस्तानी लष्कराचे सात ते आठ जवान ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील पाक लष्करातील स्पेशल सर्व्हीस ग्रुपच्या (SPG) जवानांचाही सहभाग आहे. तर काही पाकिस्तानी सैनिक जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. पाकिस्तानी बंकर, इंधन साठे, दहशतवादी तळही नष्ट झाले आहेत.
केरेन सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन
उरी, गुरेज सेक्टरबरोबरच पाकिस्तानी लष्कराने केरेन सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यास भारतीय लष्कराने जोरदार गोळीबाराने उत्तर दिले. उखळी तोफा, मशीन गनद्वारे पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा कट पाकिस्तानी लष्कराने आखला होता. मात्र, गोळीबार करत भारतीय लष्कराने पाकिस्तानचा हा डाव उथळून लावला.