इस्लामाबाद : भारतातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद देशात होत असताना, शेजारी पाकिस्तानने मदतीचा हात पुढे केला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी शनिवारी यासंदर्भात ट्विट केले.
"कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, पाकिस्तान अधिकृतपणे भारतासोबत उभा असल्याचे सांगत आहे. या संकटामध्ये पाकिस्तानतर्फे भारताला व्हेंटीलेटर, बाय-पॅप, डिजिटल एक्सरे मशीन, पीपीई आणि इतर आवश्यक गोष्टींची मदत देण्यात येईल. मानवता प्रथम या उक्तीमध्ये आम्ही विश्वास ठेवतो." अशा आशयाचे ट्विट कुरेशी यांनी केले होते.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांचे ट्विट.. दुसऱ्या एका ट्विटमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाहीद हाफीज चौधरी म्हणाले, की दोन्ही देशांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आवश्यक गोष्टी जलदगतीने पोहोचवता येतील. तसेच, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या इतर अडचणींवर मात करण्यासाठी दोन्ही बाजूंनी नवीन उपाय सुचवले जाऊ शकतात.
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीदेखील भारतातील कोरोनाची दुसरी लाट गंभीर असल्याचे म्हणत, आपण या संकटात भारतासोबत उभे असल्याचे ट्विट करत म्हटले होते. तसेच, ट्विटरवही शनिवारी दिवसभर #PakistanStandsWithIndia हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता.
हेही वाचा :ऑक्सिजन पुरवठ्यात कोणी अडथळा आणत असेल तर फासावर लटकवा-दिल्ली उच्च न्यायालय