हैदराबाद : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे कित्येक संशोधकांचे म्हणणे आहे. ही लाट कधी येईल याबाबत कोणालाही अंदाज नसला, तरी तिला तोंड देण्याच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करण्यात येत आहेत. कोव्हॅक्सिन या कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने आता लहान मुलांवरील क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत. जून महिन्यापासून या चाचण्या सुरू होणार आहेत, असे कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अॅडव्होकसी प्रमुख डॉ. राचेस एल्ला यांनी सांगितले.
एफआयसीसीआय लेडीज ऑर्गनायझेशन (एफएलओ)द्वारे आयोजित केल्या गेलेल्या एका चर्चासत्रात डॉ. एल्ला यांनी याबाबत माहिती दिली. भारत बायोटेकने लहान मुलांवरील चाचणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडे परवानगी मागितली आहे. याला तिसऱ्या वा चौथ्या तिमाहीच्या शेवटीपर्यंत मंजूरी मिळू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तसेच, यावर्षीच्या शेवटपर्यंत कोव्हॅक्सिनच्या उत्पादनात वाढ होऊन ७०० दशलक्ष डोसेसची निर्मिती करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.