मुंबई : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक अग्रगण्य गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका आहेत. त्यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. प्रसिद्ध असे पंडित सुरेशबाबू माने आणि गानहिरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिराबाई बडोदेकर यांच्या त्या शिष्या आहेत.
आठव्या वर्षांपासून गायनाकडे
१९३२ साली पुण्यातील आबासाहेब अत्रे आणि इंदिराबाई अत्रे यांच्या पोटी प्रभा अत्रे यांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या आईकडून गायनाकडे आकर्षण निर्माण झाले. त्यामुळे वयाच्या अवघ्या आठव्या वर्षीच त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. त्यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे गायनाचे शिक्षण सुरु केले. शिकत असतानाच त्यांनी हिराबाई यांना देशभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये साथ देण्यास सुरुवात केली. संगीताचे शिक्षण घेतानाच प्रभा अत्रे यांनी विज्ञान व कायद्याची पदवी मिळवली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही मिळवली.
संगीताच्या प्रचारात महत्वाचे योगदान
प्रभा अत्रे या जगभरात प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी परिचित आहेत. त्यांचे ख्याल गायकीसह ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही प्रचंड असे प्रभुत्व आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. प्रभा अत्रे या त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये अनेकदा स्वरचित बंदिशी सादर करतात. प्रभा अत्रे यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील 'जागू मैं सारी रैना', कलावती रागातील 'तन मन धन', किरवाणी रागातील 'नंद नंदन', ह्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेल्या आहेत.