गुरुग्राम (हरियाणा): OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे गुरुग्राममध्ये निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रितेश अग्रवालच्या वडिलांचा डीएलएफमधील 23व्या मजल्यावरून दुपारी 1 वाजता पडून मृत्यू झाला. घराच्या बाल्कनीतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी रमेश अग्रवाल हे घराच्या बाल्कनीतून पडले तेव्हा घरातील सदस्य घरात उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच गुरुग्राम पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रितेश अग्रवालचे ७ मार्चला झाले होते लग्न: ७ मार्चला ओयोचे संस्थापक रितेश अग्रवालचे गीतांशा सूदसोबत लग्न झाले होते. गुरुवारी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी होती. या पार्टीमध्ये देशातील अनेक प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले होते. रिसेप्शन पार्टीची छायाचित्रे सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहेत. त्याचवेळी रितेश अग्रवालने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लग्नाचे आमंत्रण दिले होते. त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन लग्नपत्रिका सुपूर्द केली होती.