चेंगलपट्टू - तामिळनाडूमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तामिळनाडूच्या चेंगलपट्टू शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना जेव्हा घडली त्यावेळी तब्बल 3 तासांपेक्षा अधिक काळ या रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा नसल्याचे बोलले जात आहे. चेंगलपट्टू जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, दिवसाला सरासरी 1 हजार 500 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. सध्या या रुग्णालयामध्ये 500 रुग्ण उपचार घेत असून, यातील 11 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे.
मंगळवारी रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. रुग्णालयाती ऑक्सिजनचा साठा संपल्याने जे रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते, त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक बनली होती. वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने यातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपल्याने यातील काही गंंभीर रुग्णांना इतर रुग्णालयात देखील हलवण्यात आले. मात्र तोपर्यंत रुग्णालयातील 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. या मृत्यूसाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले आहे.