नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिन परेड आणि बीटिंग रिट्रीट समारंभ आयोजित करण्यासाठी गेल्या पाच वर्षांत सुमारे 6.9 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती लोकसभेत सरकारकडून देण्यात आली. 2018 मध्ये 1,53,62,000 रुपये, 2019 मध्ये 1,39,65,000 रुपये आणि 2020, 2021 आणि 2022 मध्ये प्रत्येकी 1,32,53,000 रुपये खर्च करण्यात आले. सरकारने शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली. ही माहिती संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तरात दिली. बसपा खासदार हाजी फजलुर रहमान यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. यामध्ये गेल्या पाच वर्षांत दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेड आणि बीटिंग रिट्रीट सोहळ्याच्या आयोजनावर झालेल्या खर्चाचा तपशील मागवण्यात आला होता.
यावर्षीही भरघोस निधी:संरक्षण राज्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी विविध व्यवस्था करण्याचा खर्च संबंधित सहभागी/कार्यकारी संस्था/एजन्सी त्यांच्या स्वत:च्या अर्थसंकल्पीय वाटपातून उचलतात. 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी संरक्षण मंत्रालयाच्या सेरेमोनियल डिव्हिजनचे वाटप चालू आर्थिक वर्षातील सर्व औपचारिक कामांसाठी 13253000 रुपये करण्यात आले आहे.
तिकीट विक्रीतून ३४ लाख जमा:संरक्षण राज्य मंत्र्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये सांगितले की, मागील पाच आर्थिक वर्षांमध्ये सर्व प्रकारचे समारंभ आयोजित करण्यासाठी संरक्षण विभागाच्या सेरेमोनियल डिव्हिजनला बजेटच्या वाटपाशी संबंधित एकूण रक्कम 6.9 कोटी खर्च करण्यात आली आहे. या कालावधीत या कार्यासाठी तिकिटांच्या विक्रीतून जमा झालेल्या एकूण महसुलाबद्दल विचारले असता, संरक्षण राज्यमंत्र्यांनी उत्तर दिले की 2018 मध्ये तिकिटांच्या विक्रीतून 34,90,000 जमा झाले होते.