नवी दिल्ली - कोरोना संकट काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना स्वदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत योजना' सुरू केली होती. या योजने अंतर्गत आतापर्यंत 90 लाख भारतीयांना विमानाद्वारे जगातल्या विविध देशातून भारतात परत आणण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय नगरी उड्डाण वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. मे 2020 पासून ही मोहीम चालू आहे.
वंदे भारत ही जगातील सर्वात मोठी आणि विविध अनुभव शिकवणारी महत्वपूर्ण अशी मोहीम होती. भविष्यात या विशालतेचे मिशन राबवायचे असल्यास हा अनुभव उपयोगी पडेल, असे टि्वट पुरी यांनी केले. तसेच 6 जूनला वंदे भारत योजनेअंर्गत 3 हजार 479 भारतीयांना स्वदेशी आणण्यात आले आहे. यूएई, सौदी अरेबिया, मलेशिया, कतार, लंडन, काबुल, मस्कट, कुवैत, शारजाह, दोहा, रियाद येथून भारतीयांना परत आणण्यात आले.