नवी दिल्ली :2011 ते 2020 या दहा वर्षांच्या कालावधीत देशातील सहा निमलष्करी दलातील 81 हजारहून अधिक जवानांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. याच कालावधीत सुमारे 16 हजार जवानांनी राजीनामा दिल्याचेही मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कौटुंबिक तसेच आरोग्याची कारणे तसेच करीअरच्या चांगल्या संधी मिळाल्याची कारणे यामागे असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहा वर्षांत 81 हजार जवानांची स्वेच्छा निवृत्ती
सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि आसाम रायफल्स या निमलष्करी दलातील 81007 जवानांनी 2011 ते 2020 या कालावधीत स्वेच्छा निवृत्ती घेतली असून 15904 जवानांनी राजीनामी दिल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. 2013 मध्ये सर्वाधिक 2332 जवानांनी राजीनामा दिल्याचे मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.
चांगले करीअर, कुटुंबासाठी निमलष्करी दलातून बाहेर?
निमलष्करी दलातून स्वेच्छा निवृत्ती घेण्यामागे तसेच राजीनामा देण्यामागे वैयक्तिक व कौटुंबिक कारणांसह आरोग्य आणि करीअरच्या चांगल्या संधी अशी कारणे असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, देशातील सहा निमलष्करी दलात सुमारे 10 लाख जवान कार्यरत आहेत.