नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेदरम्यान देशभरात शनिवारपर्यंत कोरोना लसीचे एकूण 58 कोटी डोस नागरिकांना देण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. शनिवारी देशभरात कोरोना लसीचे 43 लाखहून अधिक डोस नागरिकांना देण्यात आल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
शनिवारी 18 ते 44 वयोगटातील 20,88,547 नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, तर 7,36,870 नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाला. लसीकरण मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाल्यापासून देशभरातील 18 ते 44 वयोगटातील 21,60,58,123 नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर 1,92,54,925 नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असे मंत्रालयाने म्हटले आहे.