न्युयॉर्क- कोरोना महामारीमुळे जगभरातील आरोग्य व्यवस्थेपुढे संकट उभं राहिल्याचे आपण २०२० वर्षात पाहिले. मात्र, हे संकट अजूनही संपले नसून येत्या वर्षातही त्याचे गंभीर परिणाम पाहायला मिळणार आहेत. लहान बालके या संकटात सर्वात जास्त भरडली गेली. नववर्षात युनिसेफने कुपोषणाचा प्रश्न आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा दिला आहे. २०२१ वर्षात सुमारे १ कोटी बालके कुपोषणाच्या खाईत लोटले जातील असे, युनिसेफने म्हटले आहे. नायजेरीया, दक्षिण सुदान, येमेनसह आफ्रिका खंडातील देशांमध्ये कुपोषणाचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे म्हटले आहे.
आफ्रिका संकटात सापडला -
आफ्रिका खंडातील देश मोठ्या मानवी संकटातून जात आहेत. येथील जनतेची अन्न सुरक्षाही धोक्यात आली आहे. त्यातच कोरोना महामारीमुळे अडचणींत आणखी वाढ झाल्याचे युनिसेफने आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे. संघर्ष, आपत्ती आणि वातावरण बदलामुळे बालकांना योग्य पोषणआहार मिळत नाही. ही सर्वात मोठी आपत्ती उद्भवल्याचे युनिसेफने म्हटले आहे.
उपासमारीचे स्थितीचे परिणाम गंभीर -
आपल्या मुलाबाळांना अशा गंभीर परिस्थितीत काय खायला घालावं, असा प्रश्न कुटुंबीयांपुढे असताना उपासमारीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यांना आपण अशा स्थितीत सोडू शकत नाही. तीव्र कुपोषण हा अपुऱ्या पोषणाचा सर्वांत गंभीर प्रकार असून त्याचे परिणाम उघडपणे दिसतात. पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. कुपोषीत मुलांचे वजन खुप कमी असते. अशा बालकांचा विकास खुटतो, तसेच विकासात अनेक अडचणी येतात.