नवी दिल्ली Opposition MPs Suspended :संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींच्या मुद्द्यावरून गुरुवारी (14 डिसेंबर) लोकसभा तसंच राज्यसभेत विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवर निवेदन करावं, अशी विरोधकांची मागणी होती. त्यामुळं गोंधळ निर्माण केल्याच्या आरोपावरून लोकसभा सभापतींनी काँग्रेस सदस्य टी एन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस यांचं हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलं आहे.
यांचं झालं निलंबन : त्यानंतरही गदारोळ सुरूच रहिल्यानं आणखी 9 सदस्यांना हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलंय. यामध्ये बेनी बेहानन (काँग्रेस), मोहम्मद जावेद (काँग्रेस), पी आर नटराजन (सीपीआयएम), कनिमोझी (डीएमके), व्ही के श्रीकंदन (काँग्रेस), के सुब्रमण्यम, एसआर पार्थिबन (डीएमके), एस वेंकटेशन (सीपीआयएम), मणिकम टागोर (काँग्रेस) यांचा या निलंबनात समावेश आहे.
सुरक्षेतील गंभीर चूक :संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत सांगितलं की, काल (बुधवार, 13 डिसेंबर) घडलेली घटना दुर्दैवी आहे. ही लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील गंभीर चूक होती. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या मुद्द्यावर बोलताना लोकसभा सभापती यांनी म्हटलंय की, कोणत्याही सदस्याकडून या घटनेवर राजकारण अपेक्षित नाही, पक्षीय राजकारणाच्या पुढं जाऊन यावर काम करावं लागेल. सुरक्षेतील त्रुटींच्या घटना यापूर्वीही संसदेत घडल्या असून तत्कालीन लोकसभा सभापतींच्या सूचनेनुसार कामकाज झालं - ओम बिर्ला, लोकसभा सभापती