हैदराबाद : एका हाताने कधीही टाळी वाजत नाही. कोणत्याही देशात मजबूत आणि विश्वासार्ह विरोधक नसेल तर त्याला लोकशाही देश म्हणता येणार नाही. हे विधान इतर कोणाचे नाही तर संविधानाचे शिल्पकार डॉ.भीमराव आंबेडकर यांचे आहे. कोणतेही सरकार निरंकुश असू नये यासाठी ते असे म्हणाले होते. गेल्या दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ज्याप्रकारचे निकाल आले आहेत आणि ज्या प्रकारे भाजपचा उदय झाला आहे, त्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्याविरोधात नीट आवाज उठवू शकलेले नाहीत.
विरोधी पक्षांची पकड महत्वाची - सध्याची परिस्थिती पाहता येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्व विरोधी पक्षांना एकत्र उभे राहावे लागेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या दिशेने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी देशातील अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. तसेच ते वेगवेगळ्या राज्यातही गेले आहेत. तिथे त्यांनी विरोधी पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा देखील केली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे शुक्रवारी विरोधी पक्षांची मोठी बैठक होत आहे.
विरोधकांमध्येच धुसफूस -विरोधी पक्ष कोणत्याही एका व्यासपीठावर आले तर ते कौतुकास्पद पाऊल म्हणावे लागेल, पण शंकाही कमी नाहीत. काही राज्यांमध्ये विविध विरोधी पक्षांमध्ये थेट स्पर्धा आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि सीपीएमने हातमिळवणी केल्यास आपण त्यांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसंच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि दिल्लीसंदर्भात वक्तव्य केलं आहे. काँग्रेसने येथून दूर राहावे, असे त्यांच्या पक्षाचे म्हणणे आहे.
विरोधक एकमेकांविरोधात -'आप'नेही राजस्थानमध्ये काँग्रेसविरोधात प्रचार सुरू केला आहे. गुरुवारी आपच्या बिहार युनिटने बिहारच्या मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टर वॉर सुरू केले. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनाही भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांना बळ देण्याची गरज आहे. पण ते काँग्रेसला जागा देतील का, हे सांगणे कठीण आहे? अशा परिस्थितीत जिथे सर्वच पक्षांचे हितसंबंध एकमेकांशी भिडत आहेत, तिथे काँग्रेस आणि डाव्यांना एकाच व्यासपीठावर आणून नितीश कुमार आपल्या ध्येयात यशस्वी होऊ शकतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मतांचे राजकारण -2014 मध्ये लोकसभेत भाजपला 292 जागा मिळाल्या होत्या, तर मतांची टक्केवारी 31.34 टक्के होती. 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या, तर मतांची टक्केवारी 37.7 टक्के इतकी होती. या मतांच्या टक्केवारीत विरोधी पक्षांना नवा मार्ग दिसला होता. बिगरभाजप पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी लक्षात घेतली तर भाजपचा पराभव करणे अवघड नाही, असे विरोधी पक्षांचे मत होऊ लागले. कर्नाटकातील भाजपचा पराभव आणि काँग्रेसच्या विजयामुळे हे दृश्य अधिक उत्साहवर्धक झाले आहे. पण विरोधी पक्षांच्या केंद्रस्थानी राहावे, अशी काँग्रेसचीही इच्छा आहे.