नवी दिल्ली - आज संसदेच्या पावसाळी अधिवशेनात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर विरोधी पक्षांनी आपला मोर्चा जंतर-मंतर येथे आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे वळवला. सर्व विरोधी पक्षाचे नेते आज शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असून केंद्र सरकारविरोधात निषेध नोंदवला.
गुरुवारी सकाळी पार पडलेल्या काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि जयराम रमेश, द्रमुकचे टीआर बालू, शिवसेनेचे संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षांचे नेते शेतकरी आंदोलनात सहभागी झाले. तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी एकता व्यक्त करण्यासाठी ते आंदोलन स्थळी पोहचले.
संसदेचे अधिवेशन पाहता शेतकरी संघटना गेल्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी जंतर -मंतरवर प्रतीकात्मक 'संसद' आंदोलन करत आहेत. तीनही कायदे रद्द करून किमान आधारभूत किंमतीची हमी देण्यासाठी कायदा करावा अशी शेतकरी संघटनांची मागणी आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.
पेगासस आणि इतर काही मुद्दे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक संसदेत मांडत आहे. या मुद्यांवर चर्चा करणे सरकार टाळत आहे. सरकार पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सहमत झाल्यानंतरच संसदेतील गोंधळ संपेल असे विरोधकांनी म्हटलं. तर पेगासस आणि शेतकरी आंदोलन हे कळीचे मुद्दे नाहीत, असे सत्ताधारी नेत्यांनी म्हटलं आहे.