नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्वेषपूर्ण ( Hate Speech ) भाषणाविरोधात भूमिका घेण्यापासून काय थांबवते आहे, असा सवाल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ( Congress President Sonia Gandhi ) विचारला आहे. एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी म्हणाल्या की, 'सण साजरे करणे, विविध धर्माच्या समुदायांमधील चांगले संबंध हे आपल्या समाजाचे फार पूर्वीपासून अभिमानास्पद वैशिष्ट्य आहे. याचा वापर संकुचित राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. तसेच ही ऐकी कमजोर करणे म्हणजे भारतीय समाज आणि राष्ट्रीयत्वाचा एकंदर आणि एकसंध पाया खराब करणे होय, असंही त्या म्हणाल्या. रामनवमीनंतर देशात अनेक ठिकाणी झालेल्या जातीय संघर्ष, हिजाब आणि अजानशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टिप्पणी केली आहे.
आर्थिक विकासाला धक्का -भारताला कायमस्वरूपी उन्मादाच्या स्थितीत ठेवण्याची ही योजना आहे. हे भारतीय समाजासाठी अधिक घातक आहे. सत्तेत असलेल्यांच्या विचारसरणीला विरोध करणारे विचार दाबले जात आहेत. राजकीय विरोधकांना लक्ष्य केले जाते आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. भारतातील विविधतेचा स्वीकार करण्याबाबत पंतप्रधानांकडून बरीच चर्चा होत आहे. परंतु कटू वास्तव हे आहे की, आपल्या समाजाला शतकानुशतके परिभाषित केलेल्या विविधतेचा उपयोग त्याच्या राजवटीत आपल्याला विभाजित करण्यासाठी केला जात आहे. सामाजिक उदारमतवादाचे बिघडलेले वातावरण आणि धर्मांधता, द्वेष आणि विभाजनाचा प्रसार यामुळे आर्थिक विकासाचा पायाच डळमळीत होत असल्याची टिप्पणी करत त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
चिंता व्यापक आणि खरी - द्वेषयुक्त भाषण कोणीही केले तरीही पंतप्रधानांना स्पष्टपणे आणि सार्वजनिकपणे द्वेषयुक्त भाषणाविरुद्ध भूमिका घेण्यापासून रोखणारे काय आहे? असा प्रश्न सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. कॉर्पोरेट जगतातील काही धाडसी लोक कर्नाटकात जे काही चालले आहे त्याविरोधात बोलत आहेत, यात आश्चर्य नाही. या धाडसी नागरिकांविरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.