नवी दिल्ली :आयकर विभागाने बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीच्या कार्यालयावर छापेमारी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भाजपवर सर्वपक्षीय नेत्यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीकेची भीती वाटत असल्याचा हल्लाबोल करुन विनाशकाले विपरित बुद्धी असल्याची टीका केली आहे. तर आपने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हुकूमशाहीचा हा कळस असल्याचे म्हटले. डाव्या पक्षाच्या वतीनेही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मात्र यावर भाजपनेही पलटवार केला आहे. बीबीसीने भारताविरोधात नेहमीच विषारी पत्रकारिता केल्याचे भाजप प्रवक्ते गौरव भाटीया यांनी म्हटले आहे. बीबीसीच्या पत्रकारितेला काळा इतिहास असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
विनाश काले विपरित बुद्धी, काँग्रेसचा हल्लाबोल :आयकर विभागाने बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीच्या कार्यालयावर छापेमारी केली. या छापेमारीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. त्यामुळे विरोधकांवर आणि माध्यमांवर बंदी घालून कोणतीही संस्था जीवंत राहणार नसल्याची टीका काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली माध्यमांची मुस्कटदाबी म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी असल्याची टीका जयराम रमेश यांनी केली. काँग्रेसने अदानी प्रकरणावर जेपीसीद्वारे चौकशीची मागणी केली आहे. तर काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल यांनी मोदी सरकार टीकेला भीत असल्याने बीबीसीवर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आल्याची टीका केली आहे.
खरे बोलणाऱ्यांना टार्गेट केले जाते : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सरकार विरोधकांना लक्ष्य करत असल्याची टीका केली आहे. सरकार खरे बोलणाऱ्यांवर कारवाई करते. ही कारवाई करताना विरोधकांसह माध्यम संस्थांनाही लक्ष्य केले जात असल्याची टीका त्यांनी केली. याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट असल्याचा हल्लाबोलही त्यांनी केला.