नवी दिल्ली INDIA Meeting:विरोधी आघाडी 'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स' (I.N.D.I.A.) ची पुढील बैठक १९ डिसेंबरला राजधानी नवी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत मुख्य अजेंडा तयार करणे, जागावाटप आणि संयुक्त रॅली आयोजित करण्याच्या कार्यक्रमावर चर्चा होऊ शकते. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी रविवारी 'X' वरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली.
'मैं नहीं, हम'चा नारा : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलंय. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांची एकता कायम ठेवत 'मैं नहीं, हम'चा नारा देत पुढे जाण्याचा निर्धार आहे.
पर्यायी सकारात्मक अजेंडा आणणार : ते म्हणाले की, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसमोर पर्यायी सकारात्मक अजेंडा आणण्याचं आव्हान आहे. २०२४ मध्ये भाजपाचा मुकाबला करण्यासाठी पक्ष चौकटीबाहेरचा विचार करेल, असं त्यांनी मान्य केलं. ते म्हणाले की, 'मैं नहीं, हम' ही एक संभाव्य घोषणा आहे ज्यावर विरोधी पक्ष मोदींचा प्रतिकार करण्यासाठी काम करतील.