श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हावडा गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. हावडा येथील या चकमकीत एका दहशतवाद्याला यमसदनी धाडण्यात जवानांना यश आले आहे. मात्र भारतीय सुरक्षा दलातील एक जवानही हावडा येथील चकमकीत जखमी झाला आहे. सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी ट्विटकरुन दिली आहे. मात्र या दहशतवाद्याची अद्यापही ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांच्या जवानानी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त केले.
हावडा गावात दहशतवादी घुसल्याने परिसराला वेढा :हावडा या गावात दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्या माहितीवरुन पोलीस आणि सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये परिसरात चकमक सुरू झाली. पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले आहे. या चकमकीमुळे परिसरात दहशत पसरली आहे. गावात दहशतवादी घुसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.