नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी टिकरी सीमेवरील एका आंदोलन शेतकऱ्याने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्या शेतकऱ्याचा रात्री 2:30 वाजता मृत्यू झाला आहे. संबधित शेतकऱ्यांची ओळख पटली असून जय भगवान असे त्यांचे नाव आहे. ते हरयाणाच्या रोहतकमधील पाकिस्मा गावातील रहिवासी आहेत.
कृषी कायद्यांविरोधात रोष व्यक्त करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या मदतीने त्यांना संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री 2:30 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जय भगवान यांनी सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी केंद्राविरोधात नाराजी व्यक्त केली. 'शेतकऱ्यांचे म्हणणे कुणी ऐकून घेत नसून. कमीत-कमी मृत शेतकऱ्याची हाक तरी कोणी ऐकेल', असं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
दिल्लीच्या सीमांवर पंजाब हरियाणासह देशातील विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये चर्चेच्या 9 फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नाही. शेतकरी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवरच ठाम आहेत. ज्यावेळी कायदा मागे घेतला जाईल त्याच वेळी आम्ही सीमेवर माघारी जाऊ असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.