पणजी (गोवा) -२५ जुलैला गोव्याच्या बेनॉलिम बीचवर १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर गोव्यात महिल्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून रणकंदन माजले होते. दरम्यान मागील काही महिन्यांचागोव्यातील महिला अत्याचारांच्या घटनाचा आलेख पाहिला तर तो उंचावत असल्याचे दिसून येते. 2021 च्या सुरुवातीपासून म्हणजेच मागील सात महिन्यात गोव्यात महिला अत्याचाराच्या 153 घटना घडल्या आहेत.
पावसाळी अधिवेशनात रणकंदन -
बाणावली समुद्रकिनारी झालेल्या दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गोव्यातील महिला सुरक्षेची लक्तरे पार विधानसभेत मांडली गेली. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी प्रथम पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाला वाचा फोडली. नंतर विरोधकांनी यावर रणकंदन माजवले असता, मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्यांच्या पालकांची असून यासाठी प्रत्येक वेळी सरकार आणि पोलिसांना जबाबदार धरू नये, असे बेजबाबदार विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी -
मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा गोव्याच्या सर्वच स्तरातून निषेध केला जातोय, त्यातच शुक्रवारी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री सावंत यांच्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप गोव्यातील महिलांनी केला आहे.
कोविड काळातही महिला अत्याचाराचा आलेख चढता -
गोव्यात जानेवारी 2021 पासून आतापर्यंत महिला अत्याचाराच्या तब्बल 153 प्रकरणाची नोंद झाली आहे. यामध्ये बलात्कार, विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, लैंगिक अत्याचार, विनयभंग, वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणे अशा घटनांच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 142 गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक 45 घटना बलात्काराचा असून 44 प्रकरणात पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 20 महिलांचे अपहरण झाले आहे. तर 23 महिलांची छेडछाड आणि 55 महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका विवाहित महिलेची घरगूती कारणावरून छळवणूक झाल्याचीही तक्रार नोंद करण्यात आली आहे. तर 9 महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.
गोव्यातील महिला अत्याचाराच्या जुलै महिन्यातील घटना -
- बाणावली येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना 25 जुलैच्या मध्यरात्री घडली होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी बाणावली समुद्र किनाऱ्यावर गेलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार केला होता.
- नोकरीचे आमिष दाखवून गोव्यात आणून एका आसामी तरुणीवर दिल्लीच्या शंभूनाथ सिंग नावाच्या तरुणाने बलात्कार केला होता. यात सुधाकर नाईक या 63 वर्षीय इसमाचा ही समावेश होता.
- 25 जुलैच्या मध्यरात्री पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या हरियाणाच्या रिया गुप्ता नावाच्या तरुणीच्या डोक्यावरून ट्रकचे चाक जाऊन मृत्यू झाला होता. म्हापसा दुलेर येथे दुचाकीवरून पडल्यानंतर या तरुणीच्या डोक्यावर एका वृत्तपत्राचा ट्रक गेला होता. यावेळी तिचा जागीच मृत्यू झाला होता.
- जुलैच्या पहिल्याच आठवड्यात बेकायदा घरांच्या बांधकामावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली होती, यात महिलांनाही मारहाण करण्यात आली होती.
- गुरुवारी सकाळी 29 जुलैला आपल्या विविध मागण्यासाठी विधानभवनावर मोर्चा काढणाऱ्या पॅरा टीचरचे आंदोलन पोलिसांनी दडपले. महिलांना फरफडत पोलीस स्थानकात नेण्यात आले होते.
- जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एक युवतीचे मांडवी पुलावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मागून तिला वाचवायला गेलेल्या तरुणानेही पुलावरून उडी मारली होती. बोटचालकांला त्या दोघांना वाचवण्यात यश आले होते. प्रेमसंबंधातून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
जून महिन्यातील घटना -
- चोरीचा आरोपावरून पोलिसांच्या छळाला कंटाळून दिरासह दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना दक्षिण गोव्यात घडली होती. हे कुटुंब मूळचे कर्नाटक येथील होते. हुलगक्का अंबिघर, देवम्मा अंबिघर या दाम्पत्यासह गंगप्पा अंबिघर याने आत्महत्या केली होती. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्यामुळे 8 आणि 10 वर्षीय दोन मुली अनाथ झाल्या होत्या.
- 9 जून रोजी मौजमजेसाठी बहिणीने पैसे द्यायला नकार दिला म्हणून शेककप्पा लमानी या तरुणाने घरकाम करणाऱ्या अनसूया लमानी या बहिणीचा डोक्यात बॅटचा प्रहार करून खून केल्याची घटना घडली होती.
- 24 जून रोजी आगाशे येथील घरकाम करणाऱ्या एका मुलीवर दोन वृद्धांनी बलात्कार केल्याची घटना घडली होती.
- 26 जून रोजी म्हापसा येथे एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय मुलाने बलात्कार केल्याची घटना नोंद करण्यात आली होती. तिच्यावर एप्रिल महिन्यात लैंगिक अत्याचार झाला होता. पीडित तरुणी दीड महिन्याची गरोदर होती. पीडित तरुणीच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या.
- डिचोली येथे रोहिग्या तरुणांच्या टोळक्याकडून 15 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यांची नोंद 26 जून रोजी करण्यात आली होती.
- 28 जून रोजी उत्तर गोव्यातील एक 17 वर्षीय तरुणीचे 17 वर्षीय मुलाने अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तरूणीचे अपहरण करून तिला कर्नाटकात नेऊन ठेवले होतो. प्रेमप्रकरणातून अपहरण केल्याची पोलिसांची माहिती दिली होती.
हेही वाचा -लैंगिक अत्याचार प्रकरण : 'गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य महिलांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन करणारं'