नवी दिल्ली :25 जूनचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण याच दिवशी 39 वर्षांपूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला होता. तसेच पहिल्यांदाच विश्वचषक आपले नाव ( India first World Cup win ) कोरले. यापूर्वीचे दोन्ही विश्वचषक वेस्ट इंडिजने जिंकले होते. हा अंतिम सामना 25 जून 1983 रोजी भारत आणि त्यावेळचा सर्वात धोकादायक संघ वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला होता. भारताने त्या सामन्यात इतिहास रचला आणि प्रत्येक आव्हानावर मात करत लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून जगाला थक्क केले. त्या दिवसापासून भारतीय क्रिकेटचे रुपडेच बदलले.
हा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतातील क्रिकेटची परिस्थिती बदलली. देशात क्रिकेटची लोकप्रियता वाढली आणि आता बीसीसीआय हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट बोर्ड आहे.
1975 साली क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली. यावेळी जागतिक क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा दबदबा होता. या दौऱ्यात कॅरेबियन संघात व्हिव्हियन रिचर्ड्स आणि क्लाइव्ह लॉईडसारखे खेळाडू होते. संपूर्ण दोन दशकांपासून वेस्ट इंडिजकडे अनेक धोकादायक वेगवान गोलंदाज होते, ज्यांना जगभरातील फलंदाज घाबरायचे.