महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही! सामनातून भाजपवर घणाघात

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. त्यावरून राज्यात तसेच देशात वेगवेळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आज सोमवार(दि.11 एप्रिल)च्या सामनाच्या अग्रलेखात सदावर्तेंसह भाजपचा चांगला समाचार घेण्यात आला आहे. (Saamana Editorial On Bjp) माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचे व मराठी परंपरेचे नुकसान करीत आहेत. असा थेट हल्ला आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत

By

Published : Apr 11, 2022, 9:02 AM IST

Updated : Apr 11, 2022, 9:29 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात तरी नेत्यांवर असे हल्ले करण्याची परंपरा नाही. दिल्लीत शरद पवारांवर एका माथेफिरूने हल्ला करताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. अण्णा हजारे वगळता सगळय़ा महाराष्ट्राने तेव्हा हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्याचे समर्थन करणारे अण्णा हजारे आज विस्मृतीत गेले. (Gunaratna Sadavarte Agains Case ) भाजपच्या गुणरत्नांचे समर्थन करणा ऱ्यांनी हे विसरू नये. माकडांची माणसं झाली यास उक्रांती म्हणतात, पण काही माकडं ही माकडेच राहिली. त्या माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये. महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही!असे म्हणत आजच्या सामनाच्या अग्रलेखात भाजपवर चांगलाच घणाघात करण्यात आला आहे.

एक 'झुंड' शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचली - एसटी कामगाराच्या मागण्या मोठ्या प्रमाणात मान्य झल्या आहेत. मात्र, कोणीएक गुणरत्न सदावर्तेच्या चिथावणीमुळे कामगारांचा एक गट आझाद मैदानावर लढण्याच्या गर्जना करीत बसला होता. यापैकी एक 'झुंड' शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचली व त्यांनी दगड, चपला वगैरे फेकून हल्ला केला. (Saamana Editorial On Gunaratna Sadavarte ) सदावर्ते हा माणूस अचानक उपटला व त्याला प्रसिद्धीमाध्यमांतून अकारण मोठेपण दिले गेले.

चिथावणीखोर भाषेचा वापर करतात - सदावर्तेचा भस्मासुर निर्माण करण्यात विरोधी पक्षाचे योगदान आहे असे स्पष्ट दिसते. विरोधकांना स्वतःला ज्या लढाया लढता येत नाहीत तेथे असे 'गुणरत्न' ताब्यात घेऊन त्यांच्या डोक्यात झिंग भरून महाविकास आघाडीच्या विरोधात उभे केले जाते. भाजपने त्यांच्या नव्या गुणरत्नाचे योग्य प्रकारे पालनपोषण केले व भाजपमधील नवहिंदुत्ववादी पुढारी ठाकरे-पवारांसारख्या ज्येष्ठ नेतृत्वाविषयी ज्या चिथावणीखोर भाषेचा वापर करतात, त्याच मार्गाचा अवलंब गुणरत्नाने केला असा थेट आरोप यामध्ये करण्यात आला.

कामगारांचे प्रश्न सुटावेत असे सरकारला वाटत होते - शरद पवार यांच्याबाबतीत भाजपने दत्तक घेतलेल्या नवरत्नांनी सांगली वगैरे भागात जी भाषा वापरली, तोच कित्ता गुणरत्नाने गिरवला. म्हणजे शाळा तीच आहे. गुणरत्नाने एस.टी. कर्मचाऱ्यासमोर अनेकदा चिथावणीची भाषणे केली व पवारांच्या घरात घुसून जाब विचारण्याचे आव्हान दिले. कामगारांचे प्रश्न सुटावेत असे सरकारला वाटत होते, पण भाजप व त्यांच्या गुणरत्नांना तसे वाटत नसावे. वातावरण अधिकाधिक चिघळावे यासाठीच प्रयत्न केले गेले. भाजपचे फडणवीस हे पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्या काळात एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण का झाले नाही, हा विचार हिंसा करणाऱ्यांच्या डोक्यात का आला नाही? असा प्रश्न करत फडणवीसांना थेट लक्ष करण्यात आले आहे.

कायद्याच्या रक्षकांनी सावध व्हायला हवे होते - कामगार नेते म्हणून गर्जना करणाऱ्या गुणरत्नांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान आणि कामगारांचे हक्क-अधिकार याबाबत बेताल भाषणे केली. गेल्या चारेक महिन्यांपासून ज्या पद्धतीची चिथावणीखोर आणि माथेफिरू पद्धतीची भाषणे हे गुणरत्ने करीत होते, तेव्हाच मुंबईतील कायद्याच्या रक्षकांनी सावध व्हायला हवे होते. शहरी नक्षलवाद समजून घ्यायचा असेल तर गुणरत्नाच्या वर्तनाकडे व भाषेकडे डोळसपणे पाहायला हवे असही यामध्ये म्हटले आहे.

मोदींचे राज्य उलथवून टाकायचे होते - शहरी नक्षलवाद हा अल कायदापेक्षा भयंकर आहे. शहरी नक्षलवाद हा उच्चशिक्षित, शहरी सुटाबुटात समाजात वावरत आहे व देश वारुळाप्रमाणे पोखरत आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेले अनेक लेखक, विचारवंत, कवी यांच्यावर शहरी नक्षलवादी असल्याचा ठपका आहे. त्यांना फडणवीस व मोदींचे राज्य उलथवून टाकायचे होते, त्यांच्यापासून फडणवीस-मोदींच्या जीवितासही धोका होता असे आक्षेप आणि आरोप भाजपची मंडळी सातत्याने करीत आली आहेत. सध्याच्या गुणरत्नाच्या कारवायाही त्याच शहरी नक्षलवादी चौकटीतच सुरू आहेत व त्याला खतपाणी घालण्याचे काम महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करीत होता असा थेट आरोप यामध्ये करण्यात आला आहे.

गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होते - भीमा-कोरेगावमध्ये (1 जानेवारी 2018)रोजी जी हिंसा उसळली होती आणि नंतर महाराष्ट्र पेटला होता, त्यावेळीही पोलीस यंत्रणेचे अपयश समोर आलेच होते. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा तेव्हाही कोलमडली होती. मुख्य म्हणजे त्यावेळी गृहखाते तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे होते. तेव्हा त्याच पोलीस यंत्रणेबाबत आज फडणवीसांनी विचारलेले प्रश्न नोंद घेण्यासारखेच आहेत असा टोला फडणवीस यांना लगावला आहे.

काही माकडं ही माकडेच राहिली - विरोधी पक्षाने महाविकास आघाडीशी राजकीय विचाराने संघर्ष करायला हरकत नाही. तो विरोधकांचा हक्क आहेच, पण माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचे व मराठी परंपरेचे नुकसान करीत आहेत. महाराष्ट्रात तरी नेत्यांवर असे हल्ले करण्याची परंपरा नाही. दिल्लीत शरद पवारांवर एका माथेफिरूने हल्ला करताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले होते. अण्णा हजारे वगळता सगळ्या महाराष्ट्राने तेव्हा हल्ल्याचा निषेध केला. हल्ल्याचे समर्थन करणारे अण्णा हजारे आज विस्मृतीत गेले. भाजपच्या गुणरत्नांचे समर्थन करणाऱ्यांनी हे विसरू नये. माकडांची माणसं झाली यास उक्रांती म्हणतात, पण काही माकडं ही माकडेच राहिली. त्या माकडांच्या हातात विरोधी पक्षाने कोलीत देऊ नये. महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही!

हेही वाचा -M C Josephine Passes Away : सीपीआय (एम)च्या ज्येष्ठ नेत्या एम.सी जोसेफिन यांचे निधन

Last Updated : Apr 11, 2022, 9:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details