हरिद्वार (उत्तराखंड) : भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने योगगुरू बाबा रामदेव यांनीही पतंजलीमध्ये आचार्य बालकृष्ण यांच्यासोबत तिरंगा फडकवला. यावेळी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासोबत पतंजली समूहाचे सर्व कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, लवकरच पाकिस्तानचे चार तुकडे होणार आहेत. पाकिस्तान हा छोटा देश म्हणून शिल्लक राहील.
'भारतम् शरणम् गच्छामि'ची घोषणा :योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, बलुचिस्तान, पीओके आणि पंजाब प्रांत वेगळे राष्ट्र बनतील. पाकिस्तान हा छोटा देशच शिल्लक राहील. काही वर्षांनी पीओकेही भारतात विलीन होईल. त्यानंतर बलुचिस्तानचसुद्धा भारतात सामील होईल. यानंतर तोसुद्धा 'भारतम् शरणम् गच्छामि' म्हणेल. कारण पंजाब, सिंध हे सर्व भारताचे मित्र आहेत. त्यांच्यात सांस्कृतिक एकरूपता आहे. पंजाब, सिंध प्रांतही भारतात विलीन होतील. यानंतर भारत महासत्ता बनेल, ही येणाऱ्या काळाची हाक आहे आणि हे होणारच असा दावा बाबा रामदेव यांनी केला.
पाच लाख लोकांना रोजगार :यादरम्यान सर्व देशवासियांना ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना बाबा रामदेव म्हणाले की, देशाला आर्थिक गुलामगिरी, लूट आणि विध्वंसातून वाचवण्याची आज आपण शपथ घेतली पाहिजे. त्याचबरोबर भारताला शिक्षण, औषधोपचाराची लूट आणि गरिबीपासून मुक्त करू. आपले सांस्कृतिक वैभव आणि अभिमान सोबत घेऊन निरोगी, समृद्ध आणि सुसंस्कृत भारत घडवण्याचा निर्धार करूया, असे रामदेवबाबा म्हणाले. सर्व देशवासीयांनी त्यांच्या भागाची जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही आतापर्यंत 5 लाख लोकांना रोजगार दिला आहे. येणाऱ्या काळात आणखी 5 लाख लोकांना रोजगार देण्याचा संकल्प रामदेवबाबांनी केला.