महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कारगिल विजय दिनी राष्ट्रपतींची जवानांना आदरांजली, पंंतप्रधान मोदींकडून जवानांच्या शौर्याचे स्मरण

देशभर आज कारगिल विजय दिन साजरा होत आहे. भारतीय सैन्य दलांनी १९९९ मध्ये याच दिवशी, ऑपरेशन विजय अंतर्गत कारगिल भागातील १८ हजार फूट उंचीवरच्या लढण्यास अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या भागात अतुलनीय पराक्रम गाजवून टायगर हिल हा प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला होता. भारताच्या ताब्यात असलेला हा भाग बळकावणाऱ्या पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी ६० दिवस चाललेल्या या संघर्षामध्ये वीरमरण आलेल्या हुतात्म्यांच्या पराक्रमाचं स्मरण म्हणून आजचा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा होतो.

द्रास येथून जवानांना श्रद्धांजली
द्रास येथून जवानांना श्रद्धांजली

By

Published : Jul 26, 2021, 11:14 AM IST

Updated : Jul 26, 2021, 11:48 AM IST

नवी दिल्ली - आज देशभरात 22 वा कारगिल विजय दिन साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद लडाखच्या द्रास सेक्टरला भेट देणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचा दौऱ्यात बदल करण्यात आला. 1999 मधील कारगिल युद्धात जवानांनी शौर्य आणि धा़डस दाखवत देशासाठी बलिदान दिले, त्या जवानांना राष्ट्रपती कोविंद यांनी बारामुल्ला येथील युद्ध स्मारकाच्या ठिकाणी आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू आणि काश्मिरसह लडाखच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ते जम्मू काश्मीर मध्ये दाखल झाले.

पाकिस्तान विरोधात सुरू झालेल्या या युद्धात 13 जून 1999 ला टोलोलिंग येथील लढाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या नॉर्थन लाइट इन्फ्रंटीवर विजय मिळवला आणि युद्धाला एक महत्वाचे वळण प्राप्त झाले होते. सुमारे 60 दिवस चालेल्या या युद्धात 26 जुलै रोजी भारताने हे युद्ध जिंकले होते. तेव्हापासून 26 जुलै हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो.

कारगिल विजय दिनी

कारगिल युद्धातील त्या शूर जवांनाच्या आहुतीचे स्मरण करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. "त्यांचे बलिदान आम्ही विसरलेलो नाही. त्यांचा पराक्रम आमच्या लक्षात आहे. कारगिलमध्ये मातृभूमीचे रक्षण करताना प्राणांचे बलिदान देणाऱ्या त्या वीरांना आम्ही आदरांजली वाहतो. त्यांचे शौर्य दरदिवशी आम्हाला प्रेरणा देत असते" असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. तसेच रविवारी झालेल्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमातून पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना कारगिल मधील वीर योद्ध्यांना नमन करावे, तसेच त्या युद्धा संदर्भातील माहिती, घटनांचे वाचन करण्याचे आवाहन केले होते.

कारगिल विजय दिनी

उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू यांनी देखील सोमवारी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करत श्रद्धांजली वाहिली. कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या सर्वोच्च बलिदानास मी सम्मानाने श्रद्धांजली वाहत असल्याचे ट्विट उपराष्ट्रपती नायडू यांनी केले होते.

आपल्या जिवाची बाजी लावून तिरंग्याची शान राखण्याऱ्या प्रत्येक जवानास हृदयापासून श्रद्धांजली अर्पण करतो. देशाच्या सुरक्षेसाठी आपण दिलेल्या बलिदानासह आपल्या परिवाराने केलेल्या त्यागाचे आम्ही सदैव स्मरण करू अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कारगिल दिनी जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

Last Updated : Jul 26, 2021, 11:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details