नवी दिल्ली -डगमगलेली अर्थव्यवस्था, कोरोना महामारी, जीएसटी, इंधन दरवाढ आणि जीडीपी दर अशा अनेक मुद्यांवरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावरून राहुल गांधींनी मोदींवर टीका केली. नागरिकांना कराव्या लागणाऱ्या खर्चावरही चर्चा व्हायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले.
केंद्र सरकारच्या कर वसूलीमुळे गाडीमध्ये इंधन टाकणे, हे काही एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नाही. मग पंतप्रधान या विषयावर चर्चा का करत नाही, असा सवाल राहुल गांधींनी केला. खर्चावरही चर्चा व्हावी, असे ते म्हणाले.
यापूर्वी राहुल गांधी यांनी टि्वट करून सरसकट सर्वांनाच कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी केली होती. कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची ठराविक अट लादली आहे. याप्रकारे वयाची अट घालणे म्हणजे निरर्थक वाद आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. गरजांवर वादविवाद करणे मुर्खपणा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे, असे त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं.