भुवनेश्वर:ओडिशाच्या गंजम येथे आज भीषण अपघात झाला आहे. ओडिशाची सरकारी बस ओएसआरटीसी बस आणि खाजगी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत किमान 12 प्रवासी ठार आहेत. तर 6 जण जखमी झाले आहेत. गंजम जिल्ह्यातील दिगापहांडीजवळ हा भीषण रस्ता अपघात झाला. अपघाताचे कारण लगेच कळू शकलेले नाही.
ओडिशा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (OSRTC) बस आणि खासगी बसमधील सर्व जखमी प्रवाशांना बेरहामपूर येथील एमकेसीजी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. अपघाती तीव्रता लक्षात घेता घटनास्थळी जिल्हास्तरीय व पोलीस अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. अपघातस्थळी रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यापूर्वी प्राथमिक उपचार करण्यात आले. रक्तस्त्राव झालेल्या गंभीर जखमी व्यक्तींच्या घटनास्थळी एकच आक्रोश होता. विदारक दृश्ये पाहायला मिळाली आहे. आज पहाटेच्या सुमारास प्रवासी झोपेत असताना हा अपघात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अपघाताच्या कारणांचा शोध सुरू-खासगी बसमधील जखमी प्रवाशांची व मृत्यूंची संख्या जास्त असल्याचे सूत्राने सांगितले. ओएसआरटीसी बस रायगडाहून ओडिशाच्या राजधानी भुवनेश्वरला जात होती. राज्यातील बेरहामपूर भागातील खंडादेउली गावातून परतत असलेल्या खासगी बसमध्ये लग्नाचे वऱ्हाड जात होते. पोलीस अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. ओडिशा सरकारने उपचारासाठी प्रत्येक जखमी व्यक्तीला 30,000 रुपये देण्याची घोषणा केली आहे.